
आरुष मात्रे (३, रा. सावरी, जि. बालाघाट), किरण संतोष वैद्दे (२६, रा. लोडाना), संतोष मात्रे (३८), सुशिला मात्रे (३५) दोघे रा. किन्ही, रुपसेन सत्यकर (३५) आणि ज्योती सत्यकर (३२) अशी मृतांची नावे आहे. तर भुमेश्वर मात्रे (४७), संगीता मात्रे (३५), राजेंद्र पंचाले (३०), लक्ष्मी पंचाल (२७), संतोष वैद्य (३५), राकेश बाहे (२४) आणि चालक संदीप बाहे अशी जखमींची नावे आहे. घरच्या गरिबीशी दोन हात करण्यासाठी त्यांनी गाव सोडले.
जखमींच्या किंकाळ्या आणि मदतीसाठी आक्रोश
भरधाव ट्रकच्या धडकेत पिकअप वाहनाचा चुराडा झाला. काही क्षणांपूर्वी एकमेकांशी बोलणाऱ्या मजुरांमध्ये अचानक किंकाळ्या आणि मदतीसाठी आक्रोश सुरू झाला. तीन वर्षांचा आरुषही या दुर्घटनेत काळाच्या पडद्याआड गेला. ज्याच्या भविष्यासाठी कुटुंब रोजगाराच्या शोधात निघाले होते, त्याचेच भविष्य या अपघाताने हिरावून घेतले. रोजगाराच्या शोधात घरापासून दूर गेलेल्या या मजुरांना परतीचा प्रवासही करता आला नाही. त्यांच्या मृत्यूने केवळ सहा जीव गेले नाहीत, तर त्यांच्या कुटुंबांचा आधारही हिरावला गेला. तेलंगणात पोहोचून दोन पैसे कमवायचे, मुलाबाळांचे शिक्षण करायचे, घरचा संसार सावरायचा… अशी छोटी-छोटी स्वप्ने घेऊन निघालेल्या या मजुरांच्या स्वप्नांचा शेवट नागराजवळ झाला. रोजगाराच्या शोधात निघालेला प्रवास मृत्यूच्या महामार्गावर संपला.
गावात पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात तेलंगणातील जगतीहाल गाठण्याचे त्यांनी ठरवले. एका पिकअप वाहनात बसून सुरू झालेला हा प्रवास त्यांच्या कुटुंबीयांसाठी आशेचा किरण घेऊन निघाला होता. पण गोंदिया जिल्ह्यातील नागराजवळ मध्यरात्रीच्या काळोखात भरधाव ट्रकने त्यांच्या स्वप्नांनाच चिरडून टाकले.
वाहनांचा अनियंत्रित वेग ठरला अपघातास कारणीभूत
अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचा वेग अनियंत्रित होता. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. याच मार्गावर गतवर्षात छोट्या मोठ्या अनेक अपघाताच्या घटना घडल्या. त्या अनेकांचा बळी गेला. अनेकांना जखम व्हावे लागले. वाहन चालविताना वाहनांच वेग नियंत्रणात ठेवावा, असे आवाह पोलिस विभागाने केले आहे.