कोल्हापूर झेडपी निवडणूक २०२६: महायुतीत 'सावळा गोंधळ', गडहिंग्लज उपविभागात भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने
गडहिंग्लज उपविभागातील आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उलथापालथी झाल्या. महायुतीत बेबनाव वाढल्याचे चित्र आहे. भाजपामध्ये इन्कमिंग वाढले आहे. तर काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजपात दाखल झाल्याने महाविकास आघाडी खिळखिळी झाली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता अधिक संख्येने मिळवण्यासाठी गडहिंग्लज विभागात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच आहे. महायुतीतील हा सावळा गोंधळ कुणाच्या पथ्यावर पडणार? याबद्दल अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. माघारीनंतर लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी महायुतीतील सावळा गोंधळाचा फटका नेमका कुणाला बसणार? याबद्दल उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
महायुतीमधील घटक पक्षांची कोअर कमिटी कार्यरत असली तरी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. त्यातून नऊ जिल्हा परिषद गटात भाजपा राष्ट्रवादी आमने-सामने उभी ठाकली आहे. गडहिंग्लज उपविभागात महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात एकमत झाले नसल्याने काही ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार रिंगणात आहेत.
चंदगड आजरा व गडहिंग्लज तालुक्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपा, जनता दल, शिवसेना शिंदे गट एकत्रित आले होते. यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी पुढाकार घेतला होता. जनता दलाच्या नेत्या प्रा. स्वाती शिंदे कोरी यांनी गडहिंग्लज नगरपालिकेत भाजपाबरोबर युती केली होती. त्यांना केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल कार्यकर्त्यांनी भाजपा बरोबर युती करून निवडणूक लढवावी, असा अट्टाहास केला. मात्र वरिष्ठ पातळीवरून राजकीय घडामोडी घडल्या. आणि जनता दलाच्या नेत्या स्वाती शिंदे कोरी भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत.
दुसरीकडे चंदगडमधून काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी भाजपाशी मैत्री केली आहे. तर गेले एक दशकाहून अधिक कालावधी कुपेकर कुटुंबात राजकीय वारसदारावरून जुंपली होती. राजकीय संघर्ष बळावला होता. अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून बाबा कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदा कुपेकर बाभुळकर व त्यांचे चुलत भाऊ भाजपातून संग्रामसिंह कुपेकर देसाई यांनी मतभेद बाजूला ठेवत एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संग्रामसिंह कुपेकर यांना नेसरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देखील जाहीर झाली आहे.
गडहिंग्लज उपविभागात माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या डॉ. नंदा बाभुळकर कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन जिल्हा परिषद निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल, गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड, आजऱ्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन करण्यावर भर दिला आहे. या अंतर्गत उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघ मुश्रीफ यांनी आपल्याकडे घेतला आहे. तर गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ देखील आपल्याकडे घेतला आहे.
Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल
गडहिंग्लज उपविभागात माजी राज्यमंत्री भरमु पाटील व आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपाचे उत्तम संघटन केले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून विनायक तथा आप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे नेसरीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, जयकुमार मुन्नोळी यांचे भाजपात इन्कमिंग झाले. त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाकडे वळले आहेत.
महायुतीच्या कोअर कमिटी बैठकीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित येऊन लढण्याचा निर्धार केला होता. मात्र त्याला गडहिंग्लज उपविभाग अपवाद ठरला आहे. या उपविभागात भाजपा, राष्ट्रवादी आमने सामने उभे ठाकले आहेत. या शिवसेना शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात देखील अंतर्गत धुसफूस असल्याने हा संघर्ष कुणाच्या पथ्यावर पडणार? याबद्दल विविध आडाखे बांधले जात आहेत.
कागल गडहिंग्लज विधानसभा मतदार क्षेत्रातील गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेला आपले अधिक समर्थक निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. चंदगड गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातून सर्वच्या सर्व नऊ जिल्हा परिषद गटाच्या जागा भाजपाच्या निवडून आणण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी कंबर कसली आहे. गडहिंग्लज उपविभागात दोन्ही राष्ट्रवादीची मदार माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदा बाभुळकर कुपेकर यांच्यावर आहे. मिनी मंत्रालयाच्या या निवडणुकीत महायुतीतील भाजपा की राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार? हे स्पष्ट होणार आहे. महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे.






