Pune ZP Election 2026: तांत्रिक बिघाड रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची खबरदारी; भोसरीत जुनी यंत्रे सीलबंद
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून, यासाठी तब्बल १४ हजारांहून अधिक मतदानयंत्रे आणि ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याच्या शेकडो घटना घडल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते तासभर मतदान थांबले होते. तातडीने पर्यायी यंत्रे उपलब्ध न झाल्याने मतदारांच्या लांब रांगा लागल्या आणि सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते. या पार्श्वभूमीवर, यंदा कोणत्याही परिस्थितीत मतदान प्रक्रिया खोळंबू नये, यासाठी अतिरिक्त यंत्रांचा साठा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीत बंद पडलेल्या १,१९२ मतदानयंत्रे आणि ८१२ कंट्रोल युनिट सध्या जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ४०० मतदान केंद्रे असून, तेथे १,६६४ मतदानयंत्रे आणि ६६० कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तर वेल्हा तालुक्यात सर्वात कमी १०५ मतदान केंद्रे असून, तेथे ४३७ मतदानयंत्रे आणि १७३ कंट्रोल युनिट उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यानी सांगितले की, “महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन, यंत्रे बंद पडल्यास तात्काळ बदल करता यावा, यासाठी मतदानयंत्रांची उपलब्धता चारपटीने वाढविण्यात आली आहे.
– अर्ज माघारीसाठी राहिले केवळ दोनच दिवस शिल्लक
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. २७ जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र २५ आणि २६ जानेवारी या सार्वजनिक सुट्टया असल्याने उमेदवारांना प्रत्यक्षात केवळ २४ आणि २७ जानेवारी असे दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत.
दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ७ गणांसाठी दाखल ९५ अर्जापैकी ४ अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. पंचायत समितीसाठी दौंडमधून ६, इंदापूरमधून ३, तर शिरूर, खेड आणि वेल्हा तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतली आहे. अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी ६११ आणि पंचायत समितीसाठी १,११० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अंतिम चित्र २७जानेवारीनंतर स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.






