धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा या आठही तालुक्यांचा समावेश आहे.
शासनाच्या २५ सप्टेंबरच्या निर्णयानुसार संबंधित तालुक्यांत तातडीने पीक पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सूट, परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमीची कामे वाढविणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्ध करून देणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्यासह विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. पीक नुकसानीची आर्थिक मदत मात्र स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.
जमीन महसूल माफी, पीक कर्जाची पुनर्रचना,कृषी कर्जाच्या वसुलीवर स्थगिती
कृषी पंपांच्या सध्याच्या वीज बिलांवर माफी (७.५ एचपी क्षमतेच्या विद्युत पंपांची बिले यापूर्वीच माफ करण्यात आली आहेत; आता त्या मर्यादेपेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठीही माफी दिली जाईल).
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात सूट.
गरजेनुसार भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जातील.
ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली आहे, तेथील शेतकऱ्यांच्या शेती पंपांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही.
शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना धान्य पुरवले जाईल.
जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली जाईल.
मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेतली जातील.
पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाणीपुरवठा योजना पूर्वीच्या आदेशानुसार सुरू राहतील.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिकांची स्थिती दर्शवणारे फोटो आणि जीपीएस डेटा गोळा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांचा दोन दिवस दौरा आणि पाहणी केली. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सरकार त्यांच्या हिताचा आणि गरजांचा विचार करून निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी दुष्काळासंबंधी आदेश जारी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत आपले आश्वासन पूर्ण केले.






