दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा आधार; कर्जमाफीसह मदतीबाबत सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य (Photo - X)
“पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे व पाहणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज येथे दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातील सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पावसाअभावी शेतीतील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मी मराठवाड्याचीच लेक असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणते. शेतकऱ्यांच्या भावनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे नुकसान झाले आहे, त्यांना त्यानुसार मदत देण्यात येईल. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, चारा तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शासन आवश्यक मदत करणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. राज्य शासन या संकटात पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल, असा धीर देत दिलासा दिला. यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






