
‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मध्यरात्रीपासून धरणे
भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या थकीत बिलप्रश्नी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने आंदोलने सुरू आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला औसा तालुक्यातील एकंबी येथील प्रधुम्न सूर्यवंशी आणि भागवत सगर या दोन शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य कमानीवर चढून तब्बल ७ तास ‘शोलेस्टाईल’ आंदोलन केले होते. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत कारखाना प्रशासनाकडून १० सप्टेंबरपर्यंत बिले अदा करण्याचे लेखी पत्र दिले होते.
चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
परंतु, ही मुदत उलटून तीन आठवडे झाले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर हक्काचे पैसे जमा झाले नाहीत. प्रशासनाची केवळ पोकळ आश्वासने आणि कारखानदारांची दिरंगाई याला कंटाळून शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी पुन्हा एकदा थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून मध्यरात्रीपासून तीव्र उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही शेतकऱ्यांनी धाराशिव शहरात ‘भीक मागो’ आंदोलन करून गोळा झालेले पैसे प्रशासनाला सुपूर्द करत कारखान्याचा निषेध केला होता. मागील ७ ते ८ महिन्यांपासून घामाचा पैसा न मिळाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यात परतीचा पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे खरिपाचे सोयाबीन पीक आधीच हातातून गेले आहे. घरातील दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण आणि बँकांची कर्जे कशी फेडायची, अशा विवंचनेत अडकलेला ऊस उत्पादक शेतकरी आता या आंदोलनाच्या माध्यमातून आरपारची लढाई लढण्याच्या भूमिकेत आहे.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
व्याजासह तात्काळ पेमेंट: मागील हंगामातील २१ कोटी रुपयांची थकीत बिले कायदेशीर व्याजासह तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग व्हावीत.
संचालक मंडळावर कारवाई: शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करणाऱ्या बिराजदार साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
नवीन हंगामावर बंदी: जोपर्यंत जुनी थकबाकी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कारखान्याला आगामी गाळप हंगामासाठी परवानगी देऊ नये.
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या धरणे आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, जोपर्यंत ठोस तोडगा निघत नाही आणि बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर; SP संदीपसिंह गिल यांची घेतली भेट