
तुळजाभवानीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने दानच समजले जातील, दानपेटीतील अंगठी प्रकरणी मंदिर संस्थानचा खुलासा
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने किंवा मौल्यवान वस्तू या दानच समजल्या जातील आणि त्या परत दिल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट खुलासा तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे. पुण्यातील एका भाविकाची सोन्याची अंगठी दानपेटीत चुकून पडल्याच्या प्रकरणानंतर माध्यमांमध्ये विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
संस्थानच्या खुलास्यानुसार, पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भाविक सुरज कृष्णा टिंगरे हे १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.१५ ते ४.३० या वेळेत तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनावेळी दानपेटी क्रमांक १२ मध्ये दान स्वरूपात रक्कम टाकत असताना त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडल्याचा त्यांचा दावा आहे. सदर अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी मंदिर संस्थानकडे लेखी अर्ज सादर केला होता.
या अर्जाच्या अनुषंगाने मंदिर संस्थानने ३ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील ठरावाचा संदर्भ दिला आहे. या ठरावानुसार, दानपेटीत भाविकांकडून नजरचुकीने पडलेल्या मौल्यवान वस्तू या दानच समजण्यात येतील व त्या कोणत्याही परिस्थितीत परत दिल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे.
या निर्णयानुसार, सुरज कृष्णा टिंगरे यांना १६ डिसेंबर रोजी मंदिर संस्थानच्या वतीने अधिकृत पत्राद्वारे ही बाब कळविण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाबाबत वस्तुस्थिती न तपासता काही प्रसारमाध्यमांनी अपूर्ण व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्याने भाविकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे संस्थानने नमूद केले आहे.
मंदिर संस्थानने आपल्या खुलाशात पुढे म्हटले आहे की, यापूर्वी अशा प्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही अपप्रवृत्तीचे लोक “दानपेटीत चुकून मौल्यवान वस्तू पडली” असा दावा करून दानपेटीतून मौल्यवान वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी तसेच दानपेटीतील पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यासाठीच हा नियम लागू करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान हे असे नियम करणारे एकमेव संस्थान नसून, देशातील अनेक प्रमुख देवस्थानांमध्येही याच धर्तीवर नियम अमलात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी अधिकृत कागदपत्रे, वस्तुस्थिती आणि मंदिर संस्थानची भूमिका समजून घेऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.