पुणे जिल्हा परिषद (फोटो- सोशल मीडिया)
निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात 71 अर्ज बाद
अनेकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न अपूर्ण
आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
पुणे: पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात चांगलीच गाळणी लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत तब्बल ७१ उमेदवारांचे एकूण ८६ अर्ज बाद झाल्याने अनेकांचे निवडणूक स्वप्न अधांतरीच राहिले. यात पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतील २४ आणि पंचायत समिती निवडणुकीतील ४७ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येने फुगलेले निवडणूक रिंगण आता थोडेसे मोकळे झाले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या २४ उमेदवारांचे २८ अर्ज, तर पंचायत समितीच्या ४७ उमेदवारांचे ५८ अर्ज छाननीत अपात्र ठरले. बाद झालेल्यांमध्ये जिल्हा परिषद उमेदवारांपैकी १९ पुरुष व ५ महिला, तर पंचायत समितीमध्ये २४ पुरुष व २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
पुरंदरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; ‘या’ मुद्द्यांवरच होणार लढत
दरम्यान, शुक्रवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २७ जानेवारीपर्यंत इच्छुकांना माघार घेता येणार आहे. मात्र, रविवार (दि. २५) सार्वजनिक सुट्टी आणि सोमवार (दि. २६) प्रजासत्ताक दिन असल्याने या दोन दिवशी माघार घेता येणार नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शेवटच्या दिवसापर्यंत गणिते बदलण्याची शक्यता आहे. यंदा पुणे जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या २१९ जागांसाठी तब्बल १,८०६ इच्छुकांनी २,३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी (दि. २२) झालेल्या छाननीनंतर ८६ अर्ज बाद झाले. परिणामी आता जिल्हा परिषदेसाठी ६२१ उमेदवारांचे ८२५ अर्ज आणि पंचायत समितीसाठी १,१२२ उमेदवारांचे १,४२४ अर्ज असे एकूण २,२४९ अर्ज वैध ठरले आहेत.
लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात
वैध ठरलेल्या अर्जांमध्ये जिल्हा परिषदेसाठी ३५८ पुरुष व २६७ महिला उमेदवार, तर पंचायत समितीसाठी ६२७ पुरुष व ४९५ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. वाढलेली महिला सहभागाची टक्केवारी यंदाच्या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. माघार प्रक्रियेनंतर २७ जानेवारी रोजी दुपारी तीननंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचाराचा खरा रंग चढणार आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात नेमके कोण-कोण उरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






