
Yedshi Toll Plaza Protest : शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानीचा एल्गार! येडशी टोलनाक्यावर ६ तास चक्काजाम; १८ नोव्हेंबरला तोडग्याची आशा
Yedshi Toll Plaza Protest : दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील येडशी टोलनाक्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी दीड वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने एका बाजूला येडशी टोलनाका ते उपळा पती आणि दुसऱ्या बाजूला चोराखळी परिसरापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला. तब्बल पाच ते सहा तास हे आंदोलन सुरू होते.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तातडीने एक लाख रुपयांची मदत द्यावी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, तसेच प्रलंबित पीकविमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.
आंदोलनादरम्यान आंदोलकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. चपाती आणि डाळ-भाताचे जेवण करून आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. चक्काजाममुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, या दरम्यान रुग्णवाहिकेला आंदोलकांनी तत्काळ वाट करून दिली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मार्ग उपलब्ध करून देण्यात आला.
आंदोलकांची भूमिका जाणून घेण्यासाठी धाराशिवचे नायब तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र, आंदोलकांनी त्यांच्या चर्चेला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान 18 नोव्हेंबर रोजी सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक बोलावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनानंतर सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुष्काळी मदत, उसाची पहिली उचल, जनावरांसाठी चारा आणि पीकविमा या मागण्यांवर 18 नोव्हेंबरच्या बैठकीत ठोस निर्णय होण्याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट
Ans: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
Ans: दुष्काळी मदत, उसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल, जनावरांसाठी चारा आणि प्रलंबित पीकविमा मिळावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
Ans: आंदोलनामुळे येडशी टोलनाका ते उपळा पती आणि चोराखळी परिसरापर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, आंदोलकांनी रुग्णवाहिकेला तत्काळ मार्ग करून दिला.