अपुऱ्या खोल्यामुळे दोन वर्ग झाडाखाली (संग्रहित फोटो)
दवंडी जिल्हा परिषद शाळेत १ ते ५ वीचे वर्ग भरत असून, एकूण विद्यार्थीसंख्या ३१ आहे. या विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनाची जबाबदारी दोन शिक्षकांवर आहे. मात्र, दोनच वर्गखोल्या असल्याने पाच इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी अनेक वर्गाचे अध्यापन करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनाही अडचणी येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शाळेला अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याची माहिती मुख्याध्यापिका रेषमा कंगाले यांनी दिली.
दरम्यान, कोरची शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या दंवडी गावातील शाळेची ही अवस्था शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार
शाळेला आवश्यक वर्गखोल्या उपलब्ध न झाल्यास पालकांचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता असून, भविष्यात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरही होऊ शकतो. त्यामुळे दंवडी शाळेसाठी तातडीने अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम मंजूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, पुरेशा आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.






