ई-वाहन टोलमाफी एसटीच्या पथ्यावर (फोटो सौजन्य-X)
मुंबई : पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकराने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावर ई-वाहनांना टोलमाफी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा एसटी महामंडळाला फायदा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन धावणाऱ्या ई-शिवनेरी बसचा दिवसाचा सुमारे चार लाख रुपयांचा टोल वाचणार आहे.
एसटीला अशाप्रकारे मोठी सवलत मिळणार असल्याने एसटीची महिन्याला अंदाजे सव्वा कोटी रुपयांची बचत होणार आहे. राज्यातील इलेट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोलनाक्यावर टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार 23 ऑगस्टपासून ‘अटल सेतू’सह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. पुणे पिंपरी-चिंचवड, मुंबई या पट्ट्यांत ई-वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या वाहनांना टोलमाफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
पुणे ते मुंबईदरम्यान एसटी महामंडळाच्या सर्वाधिक ई-बस धावतात. त्यामुळे मंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागत होता. मात्र, राज्य सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे एसटीची लाखो रुपयांची बचत होणार आहे. पुणे ते मुंबई, दादर, ठाणे, बोरिवली, मंत्रालयासाठी दररोज ९६ ई-शिनवेरी धावतात. या सर्व इ-शिवनेरी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून धावतात. या सर्व ई-बसच्या दिवसाला अडीचशेपेक्षा जास्त फेऱ्या होतात. त्यांना उर्से, खालापूर टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो.
दोन लाखांचा भरावा लागतोय टोल
द्रुतगती महामार्गावरुन धावणाऱ्या इ-शिवनेरीला दिवसाला दोन लाख रुपयांचा टोल भरावा लागत होता. याशिवाय पुणे ते मंत्रालय, स्वारगेट ते मंत्रालय, दादरसाठी सुटणाऱ्या चौदा फेऱ्यांना ‘अटल सेतू’वरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या बसना ‘अटल सेतू’ येथे अतिरिक्त ० टोल द्यावा लागत होता.
…तर फायदा महामंडळाला
राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे लाखो रुपये दिवसाला वाचणार आहेत. पुण्यातून समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या बसमध्ये सध्या तरी एकही ई-बस नाही. त्यामुळे त्याचा फायदा सध्या तरी एसटी महामंडळाला मिळणार नाही.