
"खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर...", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
सटाणा, नाशिक: सटाण्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित ठेवा आणि विकासाची गंगा जोरात येण्यासाठी शिवसेनेला विजयी करा असे आवाहन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सटाणा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी हर्षदा पाटील आणि शिवसेनेचे २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सटाण्यात प्रचार सभा घेतली. या सभेला मंत्री दादाजी भुसे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर ज्यांनी बसवले त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. सटाण्याचा पाणी प्रश्न, भुयारी गटार योजना, यशवंतराव महाराजांचे स्मारक, रस्त्यांचा विषय, राष्ट्रीय महामार्गाची कामे, उद्याने, पर्यटन स्थळांचा विकास अशी कामे केली जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.बेकायदेशीर घरपट्टी आणि पाणीपट्टी रद्द करुन वारवी घरपट्टी आणि पाणीपट्टी लागू केली जाईल, असे ते म्हणाले. सटाण्यात रस्त्यांसाठी ६७ कोटींचा निधी दिला. सटाण्याची जनता २०० टक्के विकासाच्या बाजूने असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचा धनुष्यबाण हा शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आहे. हा धनुष्यबाण विकासाचा आहे. त्यामुळे शिवसेनेचे पूर्ण पॅनल निवडून आणायचे आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. गावकरी गावाच्या प्रगतीसाठी एकत्र आले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना केलेले काम लोकांना माहित आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत केले. शेतकरी सन्मान योजना अशा अनेक योजना जनतेच्या हितासाठी केल्या, असे ते म्हणाले. आपल्याला सत्तेचा लोभ नाही तर नाव जपायचंय आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून कार्यकर्त्याला निवडून द्यायला पाहिजे, असे ते म्हणाले. सत्ता येते आणि जाते पण नाव गेलं तर परत येत नाही. सगळ्या पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. सत्ता, संपत्तीपेक्षा माणसं किती कमवली हे आपल्यासाठी महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.