आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले
आषाढी एकादशी यात्रेपूर्वी पंढरपूर शहरातील मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करून प्रशासनाने मोठा गाजावाजा केला. मात्र, यात्रा संपताच त्याच ठिकाणी पुन्हा हातगाड्या, स्टॉल, फेरीवाले आणि तात्पुरती दुकाने थाटली जात असल्याने नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा ‘दिखावा’ उघड झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.वारीच्या काळात लाखो भाविकांच्या सुरक्षेचे कारण पुढे करत प्रशासनाने अनेक हातगाड्या हटविल्या, रस्ते मोकळे केले आणि प्रदक्षिणा मार्ग अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा केला होता. त्यामुळे काही दिवस शहरातील वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसले. मात्र, आता पुन्हा मुख्य रस्त्यांसह मंदिर परिसरात अतिक्रमणांचे जाळे पसरू लागल्याने वाहतूककोंडी, पादचाऱ्यांना अडथळे आणि भाविकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.(फोटो सौजन्य – AI)
विशेष म्हणजे, आषाढ शुद्ध द्वादशीला सक्रिय झालेल्या नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचा आषाढ वद्य एकादशीपर्यंत मागमूसही दिसत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. ‘वारीपूर्वी धडक मोहीम आणि वारीनंतर कुंभकर्णी झोप’, असा अनुभव दरवर्षी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या दुर्लक्षाचे बोलके उदाहरण रविवारी पाहायला मिळाले. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आले असताना चौफाळा परिसरात त्यांच्या वाहनासमोरच परप्रांतीय फेरीवाले बिनधास्तपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. ना स्थानिक प्रशासनाने त्यांना हटविले, ना मुख्य सचिवांसोबत असलेल्या अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष गेले. शहरातील प्रमुख रस्ते आणि मंदिर परिसरात अशी उघड अतिक्रमणे सुरू असताना अतिक्रमणविरोधी यंत्रणा नेमकी कुठे होती, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
पंढरपूरसाठी हजारो कोटी रुपयांच्या कॉरिडॉर, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जुन्या घरांवर आणि कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सार्वजनिक रस्ते अडवून उभी राहणाऱ्या नव्य अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. एका बाजूला विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या मालमत्तांवर कारवाई आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, अशी दुटप्पी भूमिका प्रशासनाची असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि सातत्याने कार्यरत यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे. वारीपुरती ‘सक्रिय’ होणारी आणि नंतर गायब होणारी अतिक्रमणविरोधी मोहीम केवळ फोटोसेशन आणि दिखाव्यापुरतीच होती, असा निष्कर्ष नागरिक काढू लागले आहेत.
आषाढी काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. आता पुन्हा काही ठिकाणी अतिक्रमणे पूर्ववत झाली असतील, तर मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येईल. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविक व नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी नगरपालिका आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ऋषिकेश गड्डम, अधिकारी, नगरपालिका यांनी दिली आहे.





