साेयाबीन व्यापाऱ्यांना दणका; विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्यांकडून दंड वसूल
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे बुधवारी दुपारी १२ वाजता व्यापाऱ्यावर बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून ३३ हजार ३७१ रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. बाजार समितीचा रितसर परवाना न घेता, विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करणाऱ्या व्यापारऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरुच ठेवले जाणार आहे.
बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले व सचिव संताजी यादव म्हणाले, बाजार समितीच्या मार्गदर्शक तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रीती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती पांडुरंग भोसले, उपसभापती दिलीप अहिरेकर, माजी सभापती जयवंतराव घोरपडे, व्यापारी संचालक राहूल बर्गे व सुनील निदान यांच्या सूचनेनुसार बाजार समितीने सचिव संताजी यादव यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकाने बुधवारी सकाळी कुमठे (ता. कोरेगाव) येथे छापा टाकून विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करणाऱ्यावर कारवाई केली. बाजार समितीच्या नियमाप्रमाणे तीन पट शास्ती लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये संबंधित व्यापाऱ्याकडून ३३ हजार ३७१ रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. या कारवाईत शासकीय पंच म्हणून सहकार अधिकारी जे. एन. साबळे, कृषी पर्यवेक्षक विजय बसव व डी. डी. कदम यांनी काम पाहिले. समितीचे वाठार स्टेशनचे शाखाप्रमुख जयसिंग जगदाळे व लेखापाल राजेंद्र शिंदे यांनी कारवाई दरम्यान पंचनामा केला.
फसवणूक टाळण्यासाठी आवाहन
कोरेगाव तालुक्यात बाजार समितीच्या रितसर परवाना असल्याशिवाय व्यापार करुन शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरु राहणार आहे. तालुक्याच्या कोणत्याही भागात व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील आणि राज्य सरकारच्या हमी भावापेक्षा कमी किंमतीत माल खरेदी करत असतील, तर त्याबाबत पुराव्यासह तक्रार केल्यास बाजार समितीच्या वतीने तातडीने भरारी पथकामार्फत कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी देखील परवाना असलेल्या व्यापार्यांकडे अधिकृत शेतकरी पट्टी अथवा काटा पट्टीची मागणी करावी, जेणेकरुन कोणताही व्यापारी फसवणूक करणार नाही, अथवा शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत आणणार नाही, असे सभापती पांडुरंग भोसले व सचिव संताजी यादव यांनी सांगितले.
संताजी यादव यांना कारवाईचे अधिकार
बाजार समितीचे सभापती पांडुरंग भोसले व सचिव संताजी यादव म्हणाले, सध्या सोयाबीनचा हंगाम सुरु असून, राज्य सरकारच्या ध्येय धोरणाप्रमाणे बाजार समितीचा रितसर परवाना न घेता व्यापार केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याबाबत खातरजमा केल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या संचालक मंडळाने ठराव करुन सचिव संताजी यादव यांना कारवाईचे अधिकार बहाल केले आहेत.