अकोल्यात फुकट्या प्रवाशांकडून 1.36 कोटींचा दंड वसूल; 23 हजार 480 जणांना दणका
अकोला : दक्षिण-मध्य रेल्वे विभागांतर्गत विभागातील रेल्वे स्थानकांवर एप्रिल महिन्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये विभागातील रेल्वे स्थानकावर आणि रेल्वे गाड्यांमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत 23 हजार 480 अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 कोटी 36 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हेदेखील वाचा : सुधाकर घारे यांचे सोशल इंजिनिअरिंग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून बळ
रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि अनधिकृत रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वे विभाग नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या 9 तिकीट तपासणी मोहिमेत 23 हजार 480 अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दक्षिण-मध्य रेल्वेची विशेष मोहीम
रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी या तिकीट तपासणी मोहिमेत महत्त्वाचा सहभाग घेतला होता. या तपासणी मोहिमेत विविध ठिकाणी आणि विविध रेल्वे गाड्यांमध्ये विविध पथके तयार करून धाडी टाकण्यात आल्या. यामुळे अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करणे सोपे झाले.
अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
नांदेड विभागातील तिकीट तपासणीस, वाणिज्य निरीक्षक आणि वाणिज्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि तिकीट तपासणीच्या कामात मदत केली. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवेश करावा
तपासणीदरम्यान, अनधिकृत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांना रेल्वे परिसरातून बाहेर करण्यात आले. ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुखकर प्रवास सुनिश्चित झाला. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करावा आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी केले आहे.
हेदेखील वाचा : Local Body Elections 2025: मिशन महापालिकेसाठी भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू..; शिंदे पवारांची धाकधुक वाढली