इंदापूर : गेल्या महिन्याभरात मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने इंदापूरच्या मत्स्य बाजारात शुकशुकाट झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. परिणामी मत्स्य बाजारात मासळीची आवक पुन्हा वाढली आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुटलेले सोसाट्याचे वारे आणि याच दरम्यान धरणातून सोलापूर साठी सोडलेले पाणी यामुळे मत्स्यमारांना मोठी कसरत करूनही मासळी सापडत नव्हती. मात्र आत्ता ही परिस्थिती बदलू लागली आहे. यंदा उजनीची पाणी पातळी इतिहासातील सर्वाधिक नीचांकी (वजा ५९.९९ टक्के) स्तरावर पोहचली होती. परंतू, ४ जूनपासून पावसाने चांगलाच जोर धरला आणि गेल्या बारा दिवसात १० टक्क्यांनी पाणी पातळीत वाढ झाली. सध्या उजनीत वजा ४९.८० टक्के एकूण पाणीसाठा आहे. पावसाचा असाच जोर राहिला आणि भीमा खोऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावली तरच उजनी धरण भरू शकेल. मात्र तसे न झाल्यास काय? अशा अशंकेने उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे.
मत्स्यबीज सोडल्याचा फायदा…
गेल्या २८ वर्षात पहिल्यांदाच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग व पुणे जिल्हा वार्षिक विकास योजनेअंतर्गत, रोहू, कटला व मृगळ आदी जातीचे एक कोटी मत्स्यबीज डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीला उजनी धरणात सोडण्यात आले. याचा फायदा म्हणजे सोडलेल्या माशांची चांगली वाढ झाली आहे. दोन ते चार किलो वजनाचा कटला जातीचा मासा सध्या मोठ्या प्रमाणात मच्छीमारांना सापडू लागला आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रात शासनाकडून मत्स्यबीज सोडण्यात आल्याने मच्छीमारांना त्याचा फायदा झाला आहे. परंतू, सरकारने जुलै किंवा ऑगस्ट मध्ये मत्स्यबीज सोडले पाहिजे. असे झाल्यास माश्यांची वाढ जास्त होऊ शकते. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला माश्यांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे उजनीतील मासेमारी किमान एक महिना बंद रहावी.
– दत्तात्रेय व्यवहारे, आडते, तेजश्री फिश मार्केट इंदापूर.






