
पापलेटच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)
पालघरः महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. मात्र पालघरमध्ये राज्य मासा संकटात सापडला असून चंदेरी पापलेटची प्रजाती धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. सरसकट व लहान आकाराच्या बेसुमार मासेमारीमुळे पापलेट माशाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने आता या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या चंदेरी पापलेट अर्थात सरंगा मासा हा जगप्रसिद्ध मासा असून महाराष्ट्रातील किनारी भागातून या मासाचे मोठे उत्पादन आहे. चंदेरी पापलेट म्हणजेच सिल्व्हर पॉम्फ्रेट हा पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर आढळतो. पापलेटच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र या सगळ्यात चंदेरी पापलेटला अधिक मागणी असते. खवय्यांकडूनही सर्वाधिक पसंती असते. त्याचबरोबर या माशाची परदेशातही निर्यात केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
खरंच मासे खवय्यांना Heart Attack चा धोका असतो कमी? जाणून घ्या सत्य
वर्षनिहाय पापलेटचे उत्पादन (टनमध्ये)
२०१८-१९ – २९२.९१७
२०१९-२० – २२७.२१३
२०२०-२१ – ४५८.६१७
२०२१-२२ – २२३.०७१
२०२२-२३ – १३६.११३
लहान माशांची अपरिमित हानी
पापलेट मासा मासेमारी करताना काही विशिष्ट पद्धती वापरून ती करणे अपेक्षित असताना लहान माशांची अपरिमित मासेमारी यामुळे पापलेटची वाढ होत नाही. परिणामी पापलेटची मासेमारी करताना मच्छीमारांच्या हाती निराशा येते. मासेमारीच्या पद्धतीत गेल्या काही वर्षात बदल होत असल्यामुळे पापलेटचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. त्यातव पर्ससीन, एलईडी, परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी अशा प्रकारांमुळेही माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
राज्य मासा चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक असून संवनासाठी आणलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधीनीही यासाठी राज्य स्तरावर पत्रव्यवहार केले आहेत. मच्छीमारांनी पापलेटच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे तितकेच आवश्यक आहे. – देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, मच्छीमार कृती समिती पापलेटच्या साधनासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली असून जनजागृती कार्यक्रम मत्स्य सहकारी संस्थांमध्ये करण्यात येत आहे. लहान आकारांच्या माशांची मासेमारी करू नये, यासाठी मच्छीमारांना परावृत्त करण्याची सक्त ताकीद दिली आहे. अशा लहान माशांची मासेमारी किंवा विक्री केल्याचे आढळल्यास कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल. – दिनेश पाटील, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, पालघर- ठाणे
नुकसानीसह पापलेटचे प्रमाणही घटतेय
सध्या काही ठिकाणी १०० ग्रामव्या आत असलेल्या पापलेटची मासेमारी होत आहे. या आकारची पापलेट किलोमागे ५० नग भरत आहेत, यांचा दर एका टबला किंवा साधारण किलोमागे १२५० असा आहे. हाच दर तीन महिन्यांच्या या माशाच्या वाढीनंतर साडेबारा पट होतो. अर्थात लहान माशाच्या तुलनेत वाढ झालेली पापलेट लाखांचे उत्पन्न देतात. लहान आकारच्या माशाच्या बेसुमार मासेमारीमुळे आर्थिक नुकसानीसह पापलेटचे प्रमाणही घटत चालले आहे. प्रकारामुळे येत्या काळात हा मासा नामशेष होतो की काय अशी भीती मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.