ठाकरे गटाला भगदाड? 'हे' बडे नेते भाजपच्या वाटेवर
पुणे : पक्षनेतृत्वाकडून पुण्याकडे केले जाणाऱ्या दुर्लक्षाला कंटाळून ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक आता मशाल साेडून हातात कमळ घेणार आहेत. यामुळे आता पुण्यात शिवसेना उबाठाला मोठे भगदाड पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यात राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. एका राजकीय पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजप मध्ये प्रवेश करणार असून, या नगरसेवकांनी नुकतीच पुण्यातील एका मोठया राजकीय नेत्यासोबत भाजपच्या राज्यातील नेत्यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर लवकरच हे नगरसेवक मुंबई अथवा पुण्यात भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठाेसर, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे या माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची नावे असल्याचे समजते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पाठोपाठ राज्यात पुढील काही महिन्यात राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यातच, राज्यात लोकसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या भाजपला विधानसभा निवडणूकीत मतदारांनी पसंती दिली असून पुण्यातही भाजपला यश मिळाले असून भाजपच्या जास्त जागा निवडून आलेल्या आहेत.
त्यामुळे, २०१७ मध्ये महापालिकेवर निर्विवाद यश मिळालेल्या भाजपची सत्ता महापालिकेतही कायम राहण्याची शक्यता असल्याने या बडया राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी धसका घेतला असून, भाजपमध्ये जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी, या पाच नगरसेवकांनी नुकतीच मुंबई वारी केली असून, त्यांना पक्षात पद देण्यासह, महापालिका निवडणुकीचे तिकिटही देण्याची तयारी भाजपकडून दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे, महापालिका निवडणूकीत भाजप विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका या माजी नगरसेवकांनी घेत भाजपची वाट धरली असून, पुढील काही दिवसात ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पक्षाच्या नेतृत्वाकडून सातत्याने पुणे शहर शिवसेनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा काही जण करीत आहेत. पक्षाच्या नेत्यांकडून ताकद मिळत नाही, तसेच विधानसभा निवडणुकीतही पुणे शहरातील आठ मतदारसंघापैकी केवळ एकच मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेला मिळाला. हडपसर, वडगांव शेरी, पर्वती या मतदारसंघासाठी पक्षाच्या नेत्यांनी आग्रह धरायला हवा हाेता असे बाेलले जात आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘त्या’ खुनाचा 12 तासात छडा, दोघांना अटक; धक्कादायक कारणही समोर
आता उरले तीन…
शिवसेनेचे मागील महापालिका निवडणुकीत दहा नगरसेवक निवडुन आले हाेते. शिवसेना फुटल्यानंतर पुण्यात ठाकरेंच्या साेबत बहुतेक नगरसेवक राहीले. प्रमाेद ऊर्फ नाना भानगिरे हे शिंदेच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर माजी नगरसेवक अविनाश साबळे हे काॅंग्रेसमध्ये गेले. आठ पैकी पाच नगरसेवक भाजपच्या दारात उभे आहेत. तर पृथ्वीराज सुतार, संजय भाेसले, श्वेता चव्हाण हे तीन माजी नगरसेवक सध्यातरी ठाकरेंच्या शिवसेनेसाेबत आहेत.