
ठाणे : राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून ही बंडखोरी केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात आता ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत खळबळजनक विधान केले.
शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यात विविध नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. त्या म्हणाल्या, ‘उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांना भेटायला आले होते. त्यावेळी अर्ध्या तासानंतरच दिघे साहेबांना मृत घोषित करण्यात आले. आतमध्ये काय झाले कोणालाही माहीत नाही. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत ठाणेकरांच्या मनात आजपर्यंत संभ्रमाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे गटाचे लोक आणि शिंदे गटाचेही लोक संभ्रमात आहेत’.
…तरीही रोशनीला खासगी रुग्णालयात दाखल
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या असलेल्या रोशनी शिंदे यांच्याबाबतही मीनाक्षी शिंदे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘रोशनी शिंदेला दोन डॉक्टरांनी क्लिनचीट देऊनही वारंवार तिला खासगी रुग्णालयात दाखल करत आहेत. तिची प्रकृती ठीक आहे. तरीदेखील तिला गंभीर असल्याचे भासवले जात आहे. तसेच रोशनी शिंदे गर्भवती नसताना तिला गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे.
इंजेक्शन देऊन मारले तरी कळणारही नाही
रोशनी शिंदेबाबत आजारपण दाखवले जात आहे. त्यात उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही. आतमध्ये काय घडले हे देखील समजणार नाही. आम्ही पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.