पुणे : मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गोळीबार करुन २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीतील सहा जणांना पकडले असून, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. टोळीकडून ११ लाख १८ हजारांची रोकड, सात मोबाइल, तीन दुचाकी, कोयता असा १३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. रामनगर, वारजे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय १९, रा. राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश कसबे (वय २०, रा. मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय २३, रा. रामनगर, वारजे), गुरूजनसिंह सेवासिंह वीरक (वय २०, रा. शिवाजीनगर), निलेश बाळू गोठे (वय २०, रा. मंगळवार पेठ) यांना अटक केली आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, मयूर तुपसौंदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे व त्यांच्या पथकाने केली.
मार्केट यार्डातील भुसार बाजार परिसरात पी. एम. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शनिवारी (१२ नोव्हेंबर) भरदिवसा तरुणांचे टोळके शिरले होते. त्यांनी कंनपीतील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पिस्तुलातून जमिनीवर गोळीबार केला. त्यानंतर २७ लाख ४५ हजारांची रोकड लुटली होती.
मार्केटयार्ड पोलीस व गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून आरोपींकडून माग काढला जात होता. यावेळी कुरिअर कंपनीत दरोडा गुप्ता आणि साथीदारांनी घातल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. सीसीटीव्ही पडताळले असता त्यात आरोपी कैद झाले होते. पथकाने सापळा लावून गुप्तासह, साथीदारांना पकडले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गुप्ता याच्यावर वारजे पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. तेव्हापासून तो पसार होता. तर आरोप मारणे याच्यावर देखील मोक्कानुसार कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर तो कारागृहात होता. न्यायालयाकडून जामिन मिळवून मारणे कारागृहातून बाहेर आला होता.
लुटीचा कट कारागृहात शिजला…
आरोपी गुप्ता, मारणे आणि साथीदारांची कारागृहात ओळख झाली होती. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठी रोकड असते. त्यामुळे गुप्ता आणि मारणे यांनी साथीदारांशी संगनमत करुन कुरिअर कंपनीतील रोकड लुटण्याचा कट कारागृहात रचल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. त्यानूसार त्यांनी गोळीबार करून रोकड लुटली. परंतु, टोळीचा दोनच दिवसात पोलिसांनी शोध लावत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.