राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला आहे. मात्र, मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यावर भाजपनेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.
त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत खदखद व्यक्त केली. आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. “छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महायुतीमधील काही नेते भुजबळांची भेट घेतात का? तसेच त्यांची नाराजी दूर करण्यात येणार का? हे आता पुढच्या काही दिवसांत पाहायला मिळेल.
“माझे आणि छगन भुजबळ यांचे कौटुंबिक संबंध आहेत. भुजबळ हे एक मोठे नेते आहेत. राज्यातील ओबीसीचा मोठा चेहरा म्हणजे भुजबळ आहेत. ते महायुतीत वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही ही गोष्ट खरी आहे. त्यांच्याशी काल आणि परवा देखील मी बोललो. आता दोन दिवसांनी मी पुन्हा नाशिकला जाणार आहे. तेव्हा मी त्यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत. त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण राज्यातील ओबीसींचे ते मोठे नेते आहेत हे सर्वांना मान्य करावं लागेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. ते साम टिव्ही या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, असं छगन भुजबळ यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं.
“मंत्रिपद मिळालं नाही तरीही मी रस्त्यावर आहे. अवहेलनचं शल्य मनात आहे. मी तुम्हा सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेन. मै मौसम नहीं जो पल में बदल जाऊं, मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ, ऐसेही फेक न देना तुम्हारे बुरे वक्तमें”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.