
New FDC Rules: पालकांनो सावधान! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Centre Bans Cold Cough FDC Drugs Children Under 4: सध्या वातावरणाच्या बदलामुळे लहान मुलांना सर्दी लगेच आजार पकडतात. त्यामध्ये मुलांना सर्दी, नाक वाहणे किंवा शिंका येऊ लागतात. पालक मुलांवर लगेच उपचार करतात त्यासाठी गोळ्या औषधे दिली जातात. परंतू आता चार वर्षांखालील मुलांची थोडी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने Chlorpheniramine Maleate आणि Phenylephrine Hydrochloride ही दोन औषधी घटक असलेल्या सर्व Fixed Dose Combination म्हणजेच FDC औषधांबाबत नवा नियम लागू केला आहे. हे दोन घटक असलेली औषधे चार वर्षाखाली मुलांना देऊ नये. यासाठी सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच हे नियम पाळणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या नव्या अधिसूचनेनुसार, या दोन घटकांचे मिश्रण असलेल्या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर नियम कडक करण्यात आले आहेत. औषधाच्या पाकिटावर, लेबलवर, आत दिलेल्या माहितीत तसेच जाहिरातीच्या साहित्यावर चार वर्षांखालील मुलांसाठी हे औषध वापरू नये, अशी सूचना ठळकपणे लिहावी लागणार. हा बदल आता या घटकांचे मिश्रण असलेल्या सर्व संबंधित FDC औषधांना लागू होतो. New FDC Rules:
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक सर्दीच्या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारचा निर्णय खास या दोन घटकांच्या एकत्र वापराशी संबंधित आहे. त्यामुळे पालकांनी कोणतेही औषध स्वतःहून बंद करण्याऐवजी त्याच्या लेबलवरील माहिती आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
लहान मुलांचे शरीर मोठ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने औषधांवर प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळे एखादे औषध मोठ्या व्यक्तीसाठी योग्य असले, तरी तेच औषध अगदी लहान मुलासाठी सुरक्षित असेलच असे नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञ समिती आणि Drugs Technical Advisory Board म्हणजे DTAB यांनी या औषधांच्या वापराचा आढावा घेतला होता.
या तपासणीनंतर चार वर्षांखालील मुलांसाठी या मिश्रणामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी या वयोगटासाठी इतर तुलनेने सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या विषयावर सरकारने पहिल्यांदाच पाऊल उचललेले असे नाही. एप्रिल 2025 मध्ये काही संबंधित FDC औषधांवर वयाची मर्यादा आणि विशेष इशारा देण्याचा नियम लागू करण्यात आला होता. आता त्याची व्याप्ती वाढवून या दोन घटकांचा समावेश असलेल्या सर्व संबंधित औषधांपर्यंत हा नियम नेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या DTAB बैठकीतही चार वर्षांखालील मुलांसाठी अशा औषधांचा वापर करू नये, अशी शिफारस मान्य करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राने पुढील कारवाई केली.