पुणे / अक्षय फाटक : बलात्कार तसेच आठ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाने कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर पीडित तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावला. तिचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुणीला ही बाब समजताच तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तरुणावर गुन्हा नोंद केला.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी लखन महादेव भिसे (वय २५ रा. पिंपळी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित तरुणी शुक्रवार पेठेत राहते. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. लखन भिसे आणि या पीडित तरुणीची गेल्या वर्षी विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली होती. अनोळखीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. लखन याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच, तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यासोबतच वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून ८ लाख तीन हजार रुपयांचे दागिने घेतले होते. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली.
तसेच, दागिनेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी भिसेवर फसवणूक, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अटकेनंतर तो न्यायालयीन कोठडीत गेला. तो कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आला.
दरम्यान, खडक पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच लखन बाहेर आला आणि पुन्हा त्याने या तरुणीचा पाठलाग सुरू केला. त्याने यादरम्यान नामी शक्कल लढवली. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला ‘जीपीएस’ लावले व तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरू केले.
तसेच तिचा चोरून पाठलाग केला. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, तरुणीच्या दुचाकीवरून जीपीएस काढले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहे. सिमकार्ड कोणाच्या नावावर आहे, याची माहिती मागवली आहे, अशी माहिती उपनिरीक्षक स्वाती भोरड यांनी दिली.






