फोटो सौजन्य: iStock
राज्यात मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात लोकांचे हाल होत आहे. तसेच, पहिल्याच पावसात मुंबईची नेहमीप्रमाणे तुंबई झाली आहे. तर मुंबई लगतच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने तुफान फटकेबाजी केली आहे. खासकरून ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे.
राज्यात मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यानंतर स्पष्ट केले.
“शून्य जीवितहानी हेच आपले ध्येय आहे,” असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही तक्रार किंवा आपत्कालीन घटना आल्यास संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद द्यावा, असे निर्देश दिले. गेल्या काही वर्षांतील अनुभवाच्या आधारावर ठाणे महापालिकेने पावसाळी परिस्थितीचा प्रभावी सामना केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
Nitesh Rane: “मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामार्फत…”; मंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी चर्चा
ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रभागस्तरावर कार्यपद्धती ठरवण्यात आली असून मनुष्यबळ, जेसीबी आणि वाहने उपलब्ध आहेत. 38 ठिकाणी 66 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात आले असून, आज 135 मिमी पावसाची नोंद झाली तरी कोणतीही मोठी तक्रार आली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात 6 पर्जन्यमापक, 6 फ्लड सेन्सर कार्यरत आहेत. 43 संभाव्य ठिकाणी कर्मचारी तैनात आहेत आणि 29 जवानांचे टीडीआरएफ पथक सज्ज आहे. सी-वन गटातील 90 अतिधोकादायक इमारतींपैकी 42 रिकाम्या करण्यात आल्या असून, 197 कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे.
बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात तर मंत्रालय पाण्याखाली…; नाना पटोलेंचा हल्लाबोल
शिंदे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच, असुरक्षित स्थळी निवारा घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त गोदेपुरे आदी अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, खासदार म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाधिकारी शिनगारे यांनी पावसाळी स्थितीचा आढावा घेतला. बैठकीत नाले सफाई, इमारती रिकाम्या करणे, रस्ते दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांनी 1800-222-108 / 8657887101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.