(फोटो- istockphoto)
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार होताना दिसत आहे. त्यातच जळगावात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरासह जिल्हाभरात पावसाचे अधुनमधून झोडपणे सुरूच आहे. यामुळे शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकामध्धाये भीतीचे वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. श्रावणसरींमुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प भरले असून, शेती कामांना ब्रेक लागला आहे.
हेदेखील वाचा : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत
शहरासह जिल्हाभरात श्रावणसरी कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक फटका शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकाला बसत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शेतशिवारात पाण्याचा संचय झालेला आहे. यामुळे पीके धोक्यात आली आहेत. एकतर मजुरांची टंचाई त्यात मजूर मिळालेच तर पाऊस सुरू झाला तर काम अर्ध्यावर सोडून मजुरांना घरची वाट धरावी लागते. त्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. यामुळे पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त दिसून येत आहे. पावसाने आता उसंत घ्यावी, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. शहरी भागात अनेक रस्ते जलमय झाले आहेत.
साथीच्या रोगांमध्ये होतीये वाढ
साथरोगांचा विळखा शहरांसह ग्रामीण भागालाही होत आहे. आजारपण वाढत असल्याने डॉक्टरांकडे गर्दी दिसून येत आहे. निमोनिया, मलेरिया, डेंग्यूच्या रूग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मलेरिया विभागाकडून घरोघरी सर्व्हे केला जात आहे. अनेक मोकळ्या जागांवर दलदल झाल्याने डास, मच्छरांसह इतर आजारांच्या कीटकांची उत्पत्ती वाढली आहे.
अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’
या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावतीत पावसाचा ‘रेड अलर्ट’
कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावतीत ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे आज अतिवृष्टीसदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, जळगाव आणि सांभाजीनगर येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : गुजरातमध्ये पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर 17,800 जणांना सुरक्षितस्थळी हलवले