पावसाबाबत महत्त्वाची बातमी; अंदमानात 13 मे रोजी मान्सून होणार दाखल (File Photo : Rain News)
सांगली : अंगाची लाहीलाही करणाऱ्या तीव्र उकाड्यानंतर तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटीसह झालेल्या पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष हंगामावर संकट उभे ठाकले आहे.
सांगलीत बुधवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. यामुळे तापमान 36 अंश सेल्सिअस असताना 40 अंश भासत होते. हवेतील आर्द्रता 40 टक्के असताना सायंकाळी ढगांची आकाशात गर्दी होऊन पूर्वेकडील वाऱ्यासोबत पावसाचे आगमन झाले. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटसह पाऊस झाला. तर खानापूर भागांत पाऊस झाला. तालुक्यातील काही भागांत वाळवा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या.
वादळी वाऱ्यामुळे भाजीपाल्याचेही नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, काही बागांमध्ये तयार द्राक्षे आहेत. मणेराजुरी परिसरात गारपीट झाल्याने तयार मालातील मणी तडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
मळणीदरम्यान उडाली शेतकऱ्यांची धांदल
बुधवारी दिवसभर उन्हाचा चांगला कडाका बसत होता. उकाडा तीव्रतेने जाणवत होता. वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर दुसरीकडे गहू, हरभरा, शाळू याची मळणी चालू आहे. यामुळे शेतकरी वर्गाची या अवकाळी पावसामुळे एकच धांदल उडाली.
कराड, कोल्हापूरमध्ये सलग दोन दिवस अवकाळी
कराड, कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे वाळवणासाठी ठेवलेली ज्वारी, हरभरा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांची वाढली चिंता
या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. बीजवाई कांदा, हळद, ज्वारी यांसह आंबा बागांना मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावल्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.