Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याचे पाहिला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार तर काही भागांत तुरळक पाऊस होत आहे. मुंबईसह पुणे आणि आसपासच्या भागात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. असे असताना आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक दिवसांनी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत सोमवारी सकाळी पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रावर घोंघावतेय मोठं संकट! राज्यात पाऊस थैमान घालणार; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
दरम्यान, या मुसळधार पावसामुळे मुंबईतील तापमानात घट झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी 27 अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात 27.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा दोन्ही केंद्रावर 3 अंशाने कमी तापमानाची नोंद झाली.
गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस…
संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
परभणीसह लातूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
परभणीसह नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Update: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान; DCM एकनाथ शिंदेंनी थेट…