अतिवृष्टीचा एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा (फोटो- टीम नवराष्ट्र)
राज्यात पावसाचा जोर कायम
विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
ठाणे: मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या.
मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
दरमान धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
राज्यात पाऊस थैमान घालणार
बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रावर घोंघावतेय मोठं संकट! राज्यात पाऊस थैमान घालणार; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.