तुम्ही हवेत बाण सोडत किती काळ बोलत राहणार? फडणवीसांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत फेऱफार झाल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात फक्त सहा महिन्यात ८ टक्के मतदारांची वाढ झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, न्युजलॉण्ड्री या वृत्तसंस्थेने नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी राज्यातील फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यांत मतदार यादीत ८% वाढ झाली आहे.काही मतदान केंद्रांवर ही वाढ २०% ते ५०% दरम्यान आहे. बीएलओंनी (बूथ लेव्हल अधिकारी) काही अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती दिली आहे.माध्यमांनी शेकडो अशा मतदारांचा शोध लावला आहे, ज्यांचे पत्ते पडताळणीयोग्य नाहीत.आणि निवडणूक आयोग? शांत – की मग हातमिळवणी? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ही वेगळे गोंधळ नाहीतर तर हा मतांची चोरी आहे. झाकपाक करणे म्हणजे हा आरोप स्वीकारल्या सारखा आहे. म्हणूनच आम्ही मशीन-पठणीय डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत. असा आरोप राहुल गांधींना केला आहे.
राहुल गांधी यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर ट्विट करत राहुल गांधीं प्रत्युत्तर दिलं आहे. झूठ बोले कौआ काटे, काले कौवेसे डरियो,” अशा गाण्याच्या ओळी लिहीत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी,महाराष्ट्रातील पराभवाचे दुःख तुम्हाला दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे, हे समजू शकते. पण तुम्ही हवेत बाण सोडत किती काळ बोलत राहणार? तुमच्या माहितीसाठी सांगतो – महाराष्ट्रात असे २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्येत ८% पेक्षा अधिक वाढ झाली, आणि तरीही काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवला.
उदाहरणार्थ:
पश्चिम नागपूर – येथे ७% (२७,०६५) मतदारांची वाढ झाली आणि काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले.
उत्तर नागपूर – येथे ७% (२९,३४८) मतदारांची वाढ झाली आणि काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले.
वडगाव शेरी (पुणे जिल्हा) – येथे १०% (५०,९११) मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले.
मालाड पश्चिम – ११% (३८,६२५) मतदार वाढले आणि काँग्रेसचे अस्लम शेख निवडून आले.
मुंब्रा – येथे ९% (४६,०४१) मतदारांची वाढ असूनही शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.
म्हणूनच, हे सार्वजनिक ट्विट करण्याआधी तुमच्याच पक्षातील अस्लम शेख, नितीन राऊत, विकास ठाकरे यांच्याशी एकदा तरी चर्चा केली असती, तर किमान काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव इतका उघड झाला नसता.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वीही राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आरोप केले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार आक्षेप घेतले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल केल्या, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी थेट “मतचोरी”चा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने मौन पाळले, मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लेख लिहून प्रत्युत्तर दिले. आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरील (X) पोस्टद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे.0
राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पारदर्शक झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये लेखही लिहिले होते. या लेखांमध्ये त्यांनी महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक प्रक्रियेत ‘मॅच फिक्सिंग’ होण्याची भीती व्यक्त केली होती.
राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देत फडणवीस यांनीदेखील पुरावे सादर करून राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले. विशेष म्हणजे, राहुल गांधींचे लेख ज्या तीन प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते, त्याच वृत्तपत्रांमध्ये फडणवीसांचे प्रत्युत्तरपर लेखही प्रकाशित करण्यात आले. या लेखांमध्ये फडणवीस यांनी ‘भारत जोडो’च्या नावाखाली सुरू असलेल्या ‘भारत तोडो’ अभियानावर टीका केली. त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात नक्षलवादी संघटनांबाबत घेतलेल्या निर्णयांची आठवण करून दिली. तसेच, १९ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या आपल्या भाषणाचाही संदर्भ दिला.
राहुल गांधींना उद्देशून फडणवीस म्हणाले की, “पराभव स्वीकारून आपण कुठे कमी पडलो, जनतेशी संपर्कात काय कमतरता राहिली आणि ती दुरुस्त करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करणे अधिक संयुक्तिक ठरेल.” यासोबतच, बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांत होणाऱ्या संभाव्य पराभवांची कारणे आधीच शोधायला सुरुवात केली जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.