बेस्टमध्ये उबाठा गटाला खिंडार! शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश
मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बेस्ट कर्मचारी सेनेतील शेकडो कामगार आणि पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार शिवसेना सचिव प्रवक्ते राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष किरण पावसकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे बेस्ट युनिट अध्यक्ष किसन वाळुंज सरचिटणीस किरण साळुंखे, कोर कमिटी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चिटणीस सचिन लिमन, बेस्टचे कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या प्रवेशामुळे बेस्ट उपक्रमातील कामगार सेनेत राष्ट्रीय कर्मचारी सेना भक्कम झाली. नुकताच पार पडलेल्या बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे दोन उमेदवार निवडून आले होते.
राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष किरण पावसकर म्हणाले की, बेस्ट कामगार सेना उबाठा गटातील कुलाबा, घाटकोपर, आणि मजास या आगारातील सभासद पदाधिकारी यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत आज प्रवेश केला. बेस्ट कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षापासून भरघोस बोनस देण्याचे काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रीय कर्मचारी सेनेने केले.लवकरच बेस्ट कामगारांचा मेळावा होणार असून त्या मेळाव्यास खासदर डॉ. श्रीकांत शिंदे बेस्ट कामगारांना मार्गदर्शन करतील असं यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान बेस्टमध्ये शिवसैनिक विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणार्या कामगारांची संख्या सर्वाधिक असतानाही बेस्ट मध्ये दिवंगत कामगार नेते शरद राव यांनी आपली पकड मजबूत केली. रावांच्या एका इशार्यावर बेस्ट बंद पाडण्याची ताकद होती. बेस्ट वर्कर्स युनियनचे स्वतः अध्यक्ष असतानाही राव यांनी कधी युनियनला राजकारणाच्या दाव्याला बांधले नाही. पण कामगारांच्या हितासाठी राजकीय पक्षांना आताशी धरून राव यांनी राजकारण केले. राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली. पण आपले राजकारण युनियनमध्ये येऊ दिले नाही.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले की, राज्य सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांना निधी वाटप करत आहे आणि दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत निधी पोहोचावा. २० सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक भागात, विशेषतः मराठवाडा प्रदेशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर पुरामुळे ३०,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, “आम्ही शेतीला भेट दिली आहे आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना मदतीची विनंती करणारे पत्र सादर केले. जेव्हा जेव्हा संकट आले आहे तेव्हा केंद्र सरकारने नेहमीच मदत केली आहे.” ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली.