मराठवाडा पूरग्रस्तांना मदत करताना एकनाथ शिंदे यांचा फोटो पिशव्यांवर छापल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Eknath Shinde Photo on Bag : मराठवाडा : राज्यामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे जमीन पूर्णपणे वाहून गेली. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती आणि रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर घरे वाहून गेलेल्या ठिकाणी नेत्यांकडून मदत केली जात आहे. मात्र या मदतीसाठी असणाऱ्या पिशव्यांवर देखील एकनाथ शिंदे यांचा फोटो छापल्यामुळे विरोधी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेती वाहून गेली आहे. हाता तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाचे प्रमाण एवढे जास्त होते की लोकांचे पूर्ण संसार वाहून गेले. यामुळे जेवणाची सोय करण्यासाठी आणि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी काही वस्तू सरकारकडून दिल्या जात आहेत. मात्र या मदतीच्या पिशव्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा छापण्यात आला आहे. त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी रोष व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे आणि ‘रॅपिडो’फेम मंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोची साईज खूप लहान असून यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावेत. म्हणजे लोकांच्या डोळ्यातले दुःखाश्रू थांबतील आणि लोकं फोटो बघून आनंदाने हसतील, असा उपहासात्मक टोला रोहित पवार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पूरग्रस्तांना मदत करताना देखील फोटो छापल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कार्यकर्त्याने त्या ठिकाणी मदत वाटप केलं, तर त्या बॅगेत काय मदत साहित्य आहे, यावर लक्ष द्या. जे फोटोवर लक्ष देतात त्यांना राजकारण करायचं आहे. अशा काळात राजकारण करणं दुर्देव आहे. मदत होणं आवश्यक आहे. सिंगल कपड्यावर लोक बाहेर आहेत. त्यांना कपडे देणं, जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन भांडी देण्याच काम आपलं कर्तव्य आहे. यात कोणी राजकारण आणू नये,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.