IG Police Jalindar Supekar reactions on allegations in Vaishnavi Hagawane suicide case
पुणे : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपवले. तिने आत्महत्या केली असली तरी तिच्या शरिरावर मारहाणीचे अनेक डाग आणि व्रण दिसून आले आहेत. तसेच तिचा सासरा राजेंद्र हगवणे याची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळाले. राजकीय पार्श्वभूमी तसेच पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यासोबत असणाऱ्या नातेसंबंधांचा धाक दाखवत हगवणे कुटुंबामध्ये सुनांना छळले जात होते. या प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हात काढून घेत स्पष्टीकरण दिले आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यांनी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले. राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव या प्रकरणामध्ये आल्यानंतर त्यांनी हात वर करुन सगळ्या तपासाला समोरे जाण्याची तयारी दाखवली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये त्यांचे नाव येताच यामध्ये आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मागील दोन वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. त्यामुळे कार्यकारी पोलिस दलातील कोणताही घटक हा माझ्या आधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे, असे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुळशीचे तालुकाध्यक्ष राहिलेले राजेंद्र हगवणे यांनी सून वैष्णवी शशांक हगवणे हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामध्ये घरातील सुनांना धमकवण्यासाठी पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डॉ. जालिंदर सुपेकर यांचं पाठबळ आहे असं दाखवत मोठ्या सुनेला मयुरी हगवणेला देखील धमकावल्याचं समोर आलं आहे. याच प्रकरणाबरोबर इतर अनेक प्रकरणांमध्ये देखील डॉ. जालिंदर सुपेकर यांचे नाव घेतले जात आहे. यामध्ये भ्रष्टाचार, शस्त्र परवाना देण्याच्या अधिकार, पोलिस निरीक्षक आत्महत्या याबाबत आरोप होत आहेत. पोलिस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर तुरुंगातील खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले की, “तुरुंग विभागातील खरेदी 350 कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. ती खरेदी ही शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते. त्या समितीचा मी फक्त एक सदस्य आहे. तर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात. तत्पूर्वी त्या अर्जावर स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलिस उपायुक्तांना देतात,” असे स्पष्टीकरण पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिले आहे.
समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. त्यांच्यावर ५०० कोर्टीच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, एवढेच नाही तर सुपेकर हे जळगाव येथे कार्यरत असताना तेथील पोलिस उपनिरीक्षक अ. गो. सादरे यांनी सुपेकर यांनीच त्रास दिल्याचे पत्र लिहून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते, त्या प्रकरणावरही पुढे पडदा पडला. वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा जालिंदर सुपेकर हे सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे. ही अशोक सादरे यांची सुसाइड नोट. अशोक सदरे यांचा जालिंदर सुपेकर यांनी दोन महिन्याच्या पैशाचे कलेक्शन दिले नाही म्हणून व दिवाळीचे सोने दिले नाही म्हणून अतोनात मानसिक छळ केला आणि त्यामुळे अशोक सदरे यांनीही आत्महत्या केली होती. इतकी बेकार माणसे आहेत,” असा आरोप अंजली दमानिया यांनी पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर केला होता.