...म्हणून राज्यातील तब्बल 75 पोलिस अधिकाऱ्यांनी दिला बढतीस नकार; ACP नको सीनिअर पीआयच बरं !
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाने 2022-23 आणि 2023-24 साठी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा आदेश जारी केला होता. त्यानुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलीस उपअधिक्षपदी बढती देण्यात आली. परंतु, सहाय्यक पोलिस आयुक्तपदापेक्षा वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदालाच अनेकांची पसंती आहे. या पदोन्नतीस सुमारे 75 अधिकाऱ्यांनी नकार दिल्याची माहिती आहे. यामध्ये 24 अधिकारी एकट्या मुंबईतील आहेत.
पोलिस विभागाने एक आदेश जारी करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले असून, याची पुष्टी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी केली आहे. तसेच कारवाई झाली नाही तर याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असेल, असेही आदेशात म्हटले आहे. राज्य पोलिस विभागात पदोन्नती नाकारण्याची प्रथा आधीपासूनच सुरू आहे. पूर्वी हे प्रमाण 10 टक्के होते, तर आता हे प्रमाण 70 टक्के झाले आहे. काही अधिकारी व्यक्तिगत कारणे समोर करतात तर काही जुन्या विभागीय चौकशीचा हवाला देतात.
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या या वृत्तीमुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. पोलिस विभागातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांशी व्यवहार करण्यासाठी नियम अस्तित्वात आहेत. परंतु, अनेकदा त्यांची गांभीर्याने अंमलबजावणी केली जात नाही.
काय आहेत कारणे ?
– विभागीय कारवाईचे कारण देणे
– जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे
– दहावीतील हिंदी भाषा उत्तीर्ण प्रमाणपत्र जमा न करणे
– संगणकसंबंधी एमएस-सीआयटी प्रमाणपत्र जमा न करणे
– दरवर्षी प्रत्येकाला त्यांच्या मालमत्तेचा आणि उत्पन्नाचा तपशील द्यावा लागतो, पदोन्नतीच्या वर्षात ती माहिती न देणे.
– सहाय्यक आयुक्त होण्यापेक्षा वरिष्ठ निरीक्षक होणे फायदेशीर, ही मानसिकता.
– पीआय प्रभावशाली
– प्रत्येक वरिष्ठ निरीक्षकाला निवृत्तीपर्यंत या पदावर राहण्याची इच्छा असते. तथापि, एसीपी म्हणून बढती मिळाल्याने पगारात वाढ होते.
– शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक (पीआय) हे पद सर्वात प्रभावशाली मानले जाते. वरिष्ठ निरीक्षक हा केवळ पोलिस ठाण्याचाच नाही तर त्याच्या अधिकृत क्षेत्राचाही प्रभारी असतो आणि त्या क्षेत्रात त्याचे वर्चस्व असते.
मुंबईतील सर्वाधिक अधिकाऱ्यांचा समावेश
अधिकाऱ्यांपैकी सर्वाधिक 24 अधिकारी मुंबई शहरातील आहेत, त्यानंतर पुणे शहर आणि ठाणे शहरातील प्रत्येकी नऊ, नवी मुंबईतील सहा, एसीबीचे चार, पिंपरी चिंचवड आणि सीआयडी पुणे येथील प्रत्येकी तीन, बीडीडीएस पुणे शहर, छत्रपती संभाजी नगर शहर, सोलापूर शहर येथील प्रत्येकी दोन आणि नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, रायगड, पुणे ग्रामीण, राज्य गुप्तचर विभाग, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर ग्रामीण, सांगली, संभाजीनगर ग्रामीण आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार येथील प्रत्येकी एक अधिकारी आहेत.