आंबेगाव : आंबेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. सध्या पावसाअभावी परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली असून तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला, मात्र तोही अल्प प्रमाणात पडला आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक दृष्ट्या देखील आता संकटांचा सामना करावा लागत आहे. पावसाची परिस्थिती अत्यंत भयावह आणि चिंताजनक आहे . तालुक्यात यंदा केवळ २२ टक्के पाऊस पडला असुन सद्य परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाचे पाणी देखील आटले आहे.
दरम्यान यावर्षी तालुक्यात पावसाची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने आगामी काळात पाण्यामध्ये तूट पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डिंभे धरणात उपलब्ध पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी पाऊस पडला नाही तर धरणातील पाणीसाठा नागरीकांना पिण्यासाठी साठवुण ठेवावा लागु शकतो. यंदा ऑगस्ट महिन्यातच पाणीटंचाई भासायला सुरुवात झाली. आता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र या महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवु लागल्या आहे. सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे अनेक भागात भीषण पाणी टंचाई दिसून येते. परिणामी अनेक गावांना आणि वाड्या – वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हवामानातील अमुलाग्रह बदल, जंगलतोड, वाढते औद्योगीकरण आणि परमाणु परीक्षण यामुळे निसर्गाचे संपूर्ण संतुलन डगमगले आहे. दिवसेंदिवस निसर्ग कोपत आहे . त्याचाच परिणाम भोगावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील भातपीक देखील आता पावसाअभावी धोक्यात आले आहे तर पूर्व भागातील सर्वच पिके धोक्यात असून, या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे बळीराजाला अनेक कठीणाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चालू महिन्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तर यावर्षी आगामी काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे सर्वच गोष्टींचा विचार केला तर परस्थिती अत्यंत कठीण आणि गंभीर आहे . त्यामुळे असं झालं आहे की ‘पाणी आटलं आणि डोळ्यात साठलं ‘ सध्याच्या परिस्थितीत तर तालुक्याच्या काही भागात उन्हाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली आहे की जगावे की मरावे, अशा परिस्थितीला बळीराजा सध्या सामोरे जात आहे.
यंदाचा पावसाळी खरीप हंगाम जवळजवळ वाया गेला आहे तर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यापुढील काळात समाधानकारक पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ अटळ आहे. शेतीच्या पाण्याचे सोडा पण पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या खूप गंभीर होऊ शकते. शेतीचा जोडधंदा असलेल्या पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात संकटात आला आहे. पाणी नाही, पिके नाहीत, चारा नाही त्यामुळे जनावरांची उपासमार सुरू झाली आहे. खरीप वाया गेल्याने सर्वत्र पशु आहारात ‘न भुतो, न भविष्यती ‘अशी अवस्था झाली आहे. महागाईच्या काळात आता जनावरांचे पालन पोषण करणे देखील आता महागात पडत आहे. एकीकडे चारा महाग होत आहे तर दुसरीकडे दुधाच्या दरात वाढ होत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.