अमरावती : देशभरातील लोकसभा निवडणूकीच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मागील दीड महिन्यापासून देशभरामध्ये लोकसभा निवडणूका आणि प्रचार याचा धुरळा उडला होता. नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी देशभरातील विरोधकांनी एकत्र मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली. निवडणूकीमध्ये एनडीए आघाडीविरुद्ध इंडिया आघाडी अशी जोरदार लढत झाली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी आणि 400 पारचा आकडा गाठण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीने नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न केला. मात्र अमरावतीमध्ये महायुतीमध्ये दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावर आता प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीमधील दोन उमेदवारांमध्ये लढत
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मागील महिन्यांमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच त्यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारला भाजपचा हा निर्णय मान्य नव्हता. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर देखील भाजप आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर अमरावतीमध्ये प्रहारकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला. दिनेश बुब यांना प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि जोरदार प्रचार देखील करण्यात आला. अमरावतीमध्ये महायुतीमधील दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. यामुळे अमरावतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालापूर्वी बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला आहे.
आम्हीच विजयी गुलाल उधळणार – बच्चू कडू
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या एक्झिट पोलवर मला विश्वास नाही. त्यामध्ये नुमने थोडे घेतले जातात. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाही. एक्झिट पोल वरून अंदाज काढणं चुकीचं आहे. अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब जिंकणार असून आम्हीच विजयी गुलाल उधळणार असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे,” त्यामुळे अमरावतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.