डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि भाजपमध्ये धुसफूस सुरु असताना डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे. विकास म्हात्रे हे रविंद्र चव्हाण यांचे समर्थक मानले जात होते.
कल्याण डोबिवली शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करणे सोडले नाही. गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिंदे गटाकडून वारंवार लक्ष्य केले जात आहे. हे सगळे सुरु असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधातही भाजपमध्ये नाराजी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांनी विकास कामांबाबत वारंवार आपली खंती व्यक्त केली आहे. युतीची सत्ता खासदार, मंत्री आपल्या युतीचा आहे. तरी कामे का होत नाही. यांच्यातील मतभेद का थांबत नाही असे विकास म्हात्रे यांनी बोलून दाखविले होते.
प्रभागातील पाणी समस्या, रस्त्यांची समस्या असो. अन्य काही समस्या असो नागरीकांसमोर भाजप कार्यकर्ते बोलू शकत नव्हते. ही परिस्थिती गरीबाचा पाडा आणि राजूनगर परिसरात उद्धवली होती. वारंवार मागण्या आणि विनवणी करुन देखील काही फरक पडला नाही. अखेर विकास म्हात्रे यांनी त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह प्रभागातील कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विकास म्हात्रे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आमच्या प्रभागात अपुऱ्या निधीमुले विकास खुंटला आहे. वारंवार पत्रव्यवहार करुन देखील दखल घेतली जात नाही. अनेक रस्त्याची कामे अपुरी आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांमध्ये आमच्या विरोधात असंतोष आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही नागरीकांच्या रोषाला सामाेरे जावे लागते. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाप्रति नाराज झाले आहे.
प्रभागातील नागरीक उघडपणे बोलू लागले आहे की, इतर प्रभागात विकास कामे झपाट्याने होतात. आपल्या पक्षाचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना आपल्या प्रभागाचा विकास का होत नाही. अनियमित पाणी पुरवठा वरिष्ठांशी लेखी व तोंडी पाठपुरावा करुन अद्याप दखल घेतली गेली नाही अशा अनेक समस्या नागरीकांना भेडसावत आहेत. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडत आहोत. त्यामुळे मी, माझी पत्नी कविता आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा दोत आहोत. हा राजीनामा त्यांनी भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षाकडे दिला आहे.