फोटो - टीम नवराष्ट्र
पंढरपूर : आपल्या देशाचा आज 78 वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र साजरा केला जात आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. शासकीय इमारतींवर सजावट करण्यात आली असून ठिकठिकाणी तिरंगा लावण्यात आला आहे. सकाळपासून ध्वजारोहणाचे कार्यक्रम सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केले. स्वातंत्र दिनाचा उत्साह पंढरपूरामध्ये देखील झळकत आहेत. विठू माऊलींच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देशभक्तीने आजचा उत्सव साजरा केला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिरंग्याच्या रंगात अक्षरशः न्हाऊन निघाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि आवारामध्ये हिरवा, पांढरा आणि केसरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे. यासाठी केसरी रंगाचा झेंडू, पांढऱ्या रंगाचा अष्टर आणि हिरव्या पानाफुलांचा वापर करण्यात आला आहे. या सजावटीमुळे विठ्ठलभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे. पंढरपूरामध्ये करण्यात आलेल्या या सजावटीचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरांच्या भवय गाभाऱ्यामध्ये ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच खांबांना देखील फुलांची सजावट करण्यात आली आहे. मध्यभागी अशोकचक्र देखील लावण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे. देवाचे प्रवेशद्वार चोळखांबी सुळकांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे. त्याचबरोबर विठ्ठल व रखुमाई यांच्या पोषाखामध्ये देखील तिरंग्याची झलक दिसून येत आहे. यामुळे देवाचे मनमोहक रूप हे अधिकच खुलून दिसत आहे.