ठाणे : उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये (Ulhasnagar Hillline Police Station) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे नेते आणि कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबाराचा (Ulhasnagar Firing) व्हिडिओ देखील समोर आला असून महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. यानंतर या गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्युपिटर रुग्णालयामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील सकाळी भेट दिली होती. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर घडलेल्या या गोळीबार घटनेची पोलिसांकडून सविस्तर माहिती देखील जाणून घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. “झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
आरोपी गणपत गायकवाड यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चाताप नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे. मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती. माझा निधी वापरुन काम झालं की दादागिरी करुन श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते सांगावं. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे,”