
सातारा - पंढरपुर महामार्गावर रंबलर उभारण्यावर सकारात्मक चर्चा, धट यांच्या प्रयत्नाला यश
म्हसवड : सातारा ते पंढरपूर या महामार्गावर म्हसवड पालिका हद्दीत अनेक अपघात होऊन आजवर ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजणांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. यापुढे अपघाताला आळा बसावा, यासाठी पालिका हद्दीत रस्ते विकास महामंडळाने रंबलर उभारावेत, अशी मागणी म्हसवडचे नगरसेवक विजय धट यांनी रस्ते विकास महामंडळाच्या विभागीय कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके व दिपाली पोतदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक धट हे पालिका हद्दीत रंबलर बसवण्यासाठी फार आक्रमक झाले असून, त्यांनी यासाठी शिष्टमंडळ तयार करुन थेट रस्ते विकास महामंडळाचे विभागीय कार्यालयच गाठले. या विभागाच्या प्रमुख घोडके व पोतदार यांना पालिका हद्दीत अपघाताने किती जणांचा जीव गेला आहे तर किती जण जखमी झाल्याचा पाढा वाचत याठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर रंबलर उभारावेत अशी मागणी केली आहे.
यावेळी धट यांनी येथील मायणी चौक, शिंगणापुर चौक, एस.टी. बसस्थानक चौक, चांदणी चौक, सरकारी दवाखाना चौक, माळशिरस चौक मेरी माता विद्यालय, शिक्षक कॉलनी, रथ मार्ग बायपास रोड आदी ठिकाणी रंबलर उभारावेत व या ठिकाणी स्पिड लिमीटचे दिशादर्शक फलक उभारावेत अशी मागणी केली आहे.
या मागणीला घोडके व पोतदार या दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शिवत पालिकेने सहकार्य करण्याची अपेक्षा केली आहे. त्या धट व त्यांच्या शिष्टमंडळाने यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सदर कामी लागेल ती मदत देण्याचे पालिकेला आदेश दिले असून, रस्ते विकास महामंडळाने त्वरित याठिकाणी भेट देऊन कामाला सुरुवात करावी, असे संबंधित अधिकाऱ्यांना ही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा नगरसेवक धट यांनी व्यक्त केली आहे.
या शिष्टमंडळात जयंत ढाले, महेश गायकवाड, निशांत पिसे, पालिका अभियंता चैतन्य देशमाने आदींचा समावेश होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याने व मंत्री गोरे यांच्या पाठिंब्यामुळे हे काम लवकरच सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.