
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहणार? साताऱ्यात प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सातारा येथील सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यातील बहुतांश खासगी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली, तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे. शासकीय रुग्णालयांतील औषध सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने नियमित सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्ह्यातील मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हरसारख्या साखळी औषध दुकानांसह रुग्णालय संलग्न मेडिकल स्टोअर्स आणि जेनेरिक औषध दुकाने सुरू राहतील. त्यामुळे जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच बंदच्या नावाखाली औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची अडचण वाढविण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत औषध विक्रेत्यांना परवाने देण्यात आले असून, रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी केले आहे.
दरम्यान, औषधांची अनुपलब्धता किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे (९७३००८५५८८) आणि औषध निरीक्षक वि. वि. पाटील (९१५८८२०७८५) यांचे संपर्क क्रमांक प्रशासनाने जाहीर केले आहेत. औषध विक्रेत्यांच्या बंदमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण असले, तरी प्रशासनाने आवश्यक सेवा सुरू ठेवण्याची तयारी केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन जीवन रक्षक’ची कमाल; ४ महिन्यांत २५ प्रवाशांना मृत्यूच्या दारातून खेचलं बाहेर