पुणे : वानवडीतील महंमदवाडी परिसरात असलेल्या ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नगरमधील भिंगार, रायगड आणि चाकण येथून अटक केली. आरोपींकडून ६०१ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, एक चारचाकी, ६ मोबाईल असा ४८ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे (वय २०), सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे (वय १९), ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर (वय १९, रा. तिघे कोथरुड), पियुष कल्पेश केदारी (वय १८ रा, येरवडा), नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी (वय २०, रा. टिळेकर नगर, कात्रज), मयुर चुन्नीलाल पटेल ( वय ५३), नासिर मेहमुद शेख, (वय ३२, रा. वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत शफीउद्दीन शेख (वय २३, रा. नाना पेठ) यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, क्रांतीकुमार पाटील, अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, मयुर भोकरे, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली.
शनिवारी (दि .१८) दुपारी महंमदवाडी रस्त्यावरील मॅजेस्टिक मेमरीज सोसायटीच्या तळमजल्यावरील बी. जी. एस. ज्वेलर्स येथे दरोडेखोर सोने खरेदीच्या बहाण्याने शिरले होते. त्यांनी चेहऱ्याला मास्क लावले होते. पण, अचानक शेख यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली व ६०० ग्रॅम वजनाचे तयार दागिने घेऊन दरोडा टाकला होता. भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तत्काळ गुन्हे शाखेने खंडणी विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, युनिट चार, पाच आणि सहा असे वेगवेगळी दहा पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुण्यासह नगरमधील भिंगार, रायगडसह चाकण येथून ताब्यात घेण्यात आले. सनी उर्फ पवळे व सनी उर्फ आदित्य गाडे यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. तर मयुर पटेल याच्यावर नारायण गाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद होता. त्यात त्याची निर्दोश सुटका झालेली आहे.
आरोपींची बिअर पार्टी…
दरोड्याचा प्लॅन सक्सेस झाल्यानंतर आरोपींनी कोथरूड भागात बिअर पार्टी केली होती. दरोडा टाकून आल्यानतंर सर्व आरोपी कोथरूड भागात एकत्र भेटले. त्यावेळी एकाने बिअरचा बॉक्स आणला आणि त्यांना दिला. तसेच, सर्व सोने स्वत:कडे घेतले होते. त्यानंतर त्यांनी बिअर पार्टी केली.
….यापूर्वी दोनदा दरोड्याचा प्रयत्न
गुन्ह्यातील आरोपी मयूर पटेल, नासीर शेख हे वानवडी भागात राहायला आहेत. यातील पटेल हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तोच सूत्रधार आहे. त्याने साथीदारासह यापूर्वी देखील दोन वेळा या ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर शनिवारी अखेर त्यांनी एकत्र येत दरोड्याचा प्लॅन केला.