संग्रहित फोटो
अर्ज माघारीनंतर बहुरंगी झालेल्या लढतीमुळे मतदान वाढेल अशी अपेक्षा होती; परंतु प्रभाग ४ मधील गोंधळाने आणि मतदारांच्या उदासीनतेने निवडणूक शांत आणि थंडच राहिली. प्रभाग १० मध्ये ७४. ७३% उच्चांकी तर प्रभाग ४ मध्ये केवळ ६५. ११ % मतदान झाले. काही प्रभागांत मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याने विजयाची समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.
यंदाच्या प्रचारात पैसा उधळल्याचे चित्र इतके तीव्र होते की पदयात्रा, घर टू घर भेटी, कुपनद्वारे जेवणावळी, चहा-नाश्ता, कार्यकर्त्यांसाठी दिवसभर सेवा या सर्वांनी खर्चाचा आलेख गगनाला भिडवल्याची चर्चा आहे. सुरुवातीला मताला ३ हजार, तर शेवटच्या क्षणी काही ठिकाणी १० हजार रुपये दिल्याचे बोलले जात असून, अनेक उमेदवार हात जोडून “पुन्हा निवडणूक नको रे बाबा!” अशी विनंती करताना दिसल्याचे सांगितले जाते.
अशी कोटींची निवडणूक होत असेल तर सर्वसामान्य, सुशिक्षित, काम करणारा नागरिक नगरपालिका निवडणुकीत उतरू तरी शकतो का ? असा एक गंभीर प्रश्न तासगावकरांसमोर उभा राहिला आहे, तासगावची नगरपरिषद यापुढे विकासाच्या मार्गावर जाणार की पैशांच्या राजकारणात अडकणार, या उत्सुकतेसोबतच स्पष्ट चिंता आता पसरू लागली आहे.






