कराड शेतकरी आंदोलन, पाणी उपसा बंदी, कृष्णा नदी, कोयना नदी, सातारा जिल्हा, बळीराजा शेतकरी संघटना, पाणीटंचाई, शेती संकट, तहसील कार्यालय, शेतकरी निदर्शने
कराड/प्रतिनिधी : कृष्णा आणि कोयना नदीवरील पाणी उपसा बंदीचा आदेश तात्काळ रद्द करून शेती व जनावरांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी कराडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला. बळीराजा शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत शासनाच्या पाणी धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
प्रशासकीय कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या पाणीटंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतीपिके वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी राज्यात विक्रमी पाऊस झाला होता. तरीही जलसंपदा विभागाच्या नियोजनातील त्रुटींमुळे धरणांतील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणसाठा झपाट्याने घटला आणि अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत असून नदीवरील उपसा बंदीमुळे उभी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, शेती व पशुधनासाठीही नियोजनबद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. पाणीअभावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, तसेच चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन
यावेळी शिवाजी पाटील, दिगंबर माने, प्रल्हाद माने, विश्वजीत थोरात, संदीप साळुंखे, दीपक पाटील, सुजित पाटील, आबासो पाटील, संजय माळी, रामचंद्र पाटील यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने पाणी उपसा बंदीचा आदेश त्वरित मागे घेतला नाही आणि शेतीसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन केले नाही, तर सातारा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक






