बावधन गटातील शाळांचा शैक्षणिक दर्जा जिल्ह्यात अव्वल करणार; ऋतुजा शिंदेंचा निर्धार
वाई- परखंदी (ता. वाई) हायस्कूल येथे शुक्रवार दि. ०७ रोजी बावधन जिल्हा परिषद गटाच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या सदस्यांची नियुक्ती व पहिली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आणि शाळांमधील गुणवत्ता वृद्धीसाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत, प्रतिमा पूजन, ईशस्तवन तसेच प्रास्ताविक झाले. शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ बाळेकर यांनी समितीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. यानंतर शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आणि शिक्षक-पालक सहभाग अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमात पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिक्षणाच्या गुणवत्तेला नवे बळ देण्याचा संदेश देण्यात आला.
Satara Fire : विद्यार्थ्यांची वेळ टळली, अनर्थ टळला; सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये आगीचा भडका
या बैठकीस समितीच्या अध्यक्षा ऋतुजा विराज शिंदे (सभापती – महिला व बालकल्याण जिल्हा परिषद सातारा), प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, समितीचे सदस्य सचिन भोसले पाटील (पंचायत समिती सदस्य – वाई), गट शिक्षण अधिकारी हर्षवर्धन मोरे, समिती सदस्य शंकर गाढवे (सरपंच – बोपर्डी), परशुराम मांढरे, अभिजीत शिंदे, प्रतीक पिसाळ, दत्तात्रेय ढेकाणे, शरद यादव, संभाजी जाधव, सुशीला यादव, कविता नेवसे, निर्मला भांगरे, वीरधवल भिलारे, नवनाथ मालुसरे, समितीचे सचिव साईनाथ वाळेकर, प्रसाद यादव यांच्यासह बावधन गटातील सर्व शिक्षक, स्कुल कमिटीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, नवीन शाळेच्या खोल्या बांधणे,शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करणे तसेच शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
“शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, गुणवत्तेचा नवा अध्याय” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.






