कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशनजवळील चिंचवली येथील रेल्वे गेट क्रमांक 23 येथे रेल्वे गेट आहे. सध्या वाढलेली वाहने यामुळे त्या ठिकाणी असलेल्या फाटक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आणि मुंबई पुणे रेल्वे मार्ग रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी फाटक बंद करून त्यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रेल्वेने नोटीस बजावली असली, तरी या प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
चिंचवली येथील या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणी साठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांना शासनाने जमिनीचा योग्य मोबदला द्यावा. तसेच पुलाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन तुकडे होणार आहेत. यामुळे जमिनीचे मूल्य कमी होऊन ती निरुपयोगी ठरणार आहे. अशा जमिनींचाही विचार करून योग्य दर द्यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे अत्यल्प जमीन शिल्लक राहणार आहे, ती संपूर्ण जमीन रेल्वेने ताब्यात घेऊन त्याचा योग्य मोबदला द्यावा या उड्डाण पुलामुळे केवळ शेतीच नाही, तर गावातील सामाजिक आणि धार्मिक बाबींवरही या पुलाचा परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या उड्डाण पुलामुळे गावातील अंत्यविधीसाठी जाताना ग्रामस्थांना 2-3 किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी रस्ता किंवा भुयारी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
दरवर्षी होणारा गोविंदा उत्सव, गणपती विसर्जन आणि श्रीरामाची पालखी यांसारख्या धार्मिक सोहळ्यांच्या मिरवणुकीत या पुलामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील शाळा आणि मेडिकल कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासावर याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या सर्व तांत्रिक आणि सामाजिक समस्यांचा सकारात्मक विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती चिंचवलीकर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन संभाव्य बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुक्याचे तहसीलदार यांना दिले आहे.






