
कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे रणशिंग; जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठी मेळावा
कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ही निवडणूक केवळ पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघापुरती मर्यादित नसून, सरकारविरोधी संताप व्यक्त करण्याची आणि दिल्लीचे तख्त उलथवून टाकण्याची हीच ती योग्य वेळ आहे, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापुरातील मेळाव्यात रणशिंग फुंकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील मेळाव्यात बोलताना म्हणाले, या निवडणुकीतील मतदार अत्यंत विचारी आहेत. जयंत आसगावकर यांनी आमदारकीच्या काळात उत्कृष्ट काम केले असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. हर्षदा देशमुख-जाधव या सुस्वभावी व उच्चविद्याविभूषित उमेदवार असून त्या पदवीधरांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देतील. पेपरफुटीसारख्या गंभीर मुद्यांवरून आज तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकदीने उभे राहून दोन्ही उमेदवारांना विधानपरिषदेत पाठवा.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात दोन्ही उमेदवारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, जयंत आसगावकर यांनी आपला शंभर टक्के निधी शिक्षणावर आणि शाळांवरच खर्च केला आहे. जुन्या पेन्शनचा वणवा कोल्हापूरच्या मोर्चानेच पेटवला होता. तरुणींच्या आणि तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करणारी, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी हर्षदा ही सक्षम उमेदवार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील हुकूमशाही आणि भाजपरुपी सैतानाला रोखण्याची सुरुवात पुरोगामी कोल्हापुरातूनच होईल. ईव्हीएमबद्दलचा संशय खरा ठरवण्याची आणि भामट्यांचा पाडाव करण्याची हीच संधी आहे असे मत मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संस्कृतीचे उपदेश देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आयाबहिणींवर हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला? हा प्रश्न उपस्थित करतानाच ही लढाई परिवर्तनाची असून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे अतिशय अभ्यासू व सक्षम आहेत. परिवर्तनाची सुरुवात हे गोकुळ व पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून होणार आहे. हे परिवर्तन शेतीसाठी, शिक्षणासाठी, तरुणांसाठी महत्वाचे आहे असे स्पष्ट केले.
हर्षदा देशमुख-जाधव यांनी कोल्हापूरची माती राजर्षी शाहू महाराजांच्या समता व सामाजिक न्यायाचा विचार देणारी आहे. पदवीधरांना रोजगार नाही आणि शिक्षकांना शालाबाह्य कामांचे ओझं आहे. तरुणांना स्थिरता, पारदर्शकता आणि समान संधी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले. तर जयंत आसगावकर यांनी मी पूर्वीसारखाच सदैव शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या सेवेत कार्यरत राहीन. पदवीधर आणि शिक्षकांच्या हक्कासाठी माझी लढाई अशीच चालू राहील असे प्रतिपादन केले.
मेळाव्यास माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज पाटील, राजू लाटकर, व्ही. बी. पाटील, सारंग पाटील, विजय नाडकर, प्रभाकर देशमुख, राजू आवळे, शिवाजी खांडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“महाविकास आघाडी म्हणून माझी भूमिका कधीही बदलणार नाही. माझे १०० टक्के सहकार्य हर्षदा यांनाच राहील. ३० ऑक्टोबरला जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांचा आमदार म्हणून सत्कार याच कोल्हापुरात होईल” -आमदार सतेज पाटील.
हे सुद्धा वाचा : रात्रीचा प्रवास ठरला अखेरचा; म्हैसपूर फाट्याजवळ दुचाकीला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू
“सतेज पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी भाजपने निष्ठावंतांना डावलून अचानक बाहेरची व्यक्ती आयात करून उमेदवारी दिली आहे. मात्र, कोल्हापूरची स्वाभिमानी माती अशा राजकीय डावांना भूलणार नाही आणि विरोधकांना धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही.” – मेहबूब शेख.