
‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना चिवटे म्हणाले की, आपण कोणत्याही शिक्षणसम्राट किंवा शिक्षणमहर्षींच्या कुटुंबातून आलेलो नसून सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील कार्यकर्ता आहे. गेल्या दशकभरातील आरोग्यसेवेतील कामासोबतच मागील दोन-तीन वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. जुनी पेन्शनच्या आंदोलनांपासून टप्पावाढीच्या लढ्यापर्यंत आपण प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला.
‘माझ्याकडे एकनाथ शिंदे; सोबत २२ हजार शिक्षक’
भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासह महायुतीतील इच्छुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना चिवटे यांनी “त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि यंत्रणा असतील; मात्र माझ्याकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ‘एकनाथ सोयरा’ व ‘शिक्षक सेना’च्या माध्यमातून नोंदणी झालेले २२ हजार शिक्षक मतदार आहेत,” असा दावा केला.
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येईल आणि भाजपचे कौस्तुभ गावडे उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सचिन सानप हेही जवळचे सहकारी असून वरिष्ठांचा आदेश ते मानतील, असे चिवटे म्हणाले. शिक्षकांचा प्रतिसाद वाढत असून ही निवडणूक आता शिक्षकांनीच हातात घेतली आहे. “लढायचं आणि जिंकायचं,” या निर्धाराने मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले. बोगस मतदान रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच आक्षेप नोंदविले असून दुबार-तिबार नोंदणीवरही लक्ष ठेवले जात असल्याचे चिवटे यांनी स्पष्ट केले.