
पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी आज (६ ऑक्टोबर) पुणे विधानभवन येथे भव्य शक्तीप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पदवीधरांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता, ठोस कृतीचा अजेंडा घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील विविध घटकांमधील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष वसंत मोरे, तसेच के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक कल्याण जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या हस्ते संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, “पदवी ही केवळ कागदी प्रमाणपत्रापुरती मर्यादित राहू नये. त्यातून रोजगार, नवीन कौशल्ये आणि संधींची नवी दिशा निर्माण झाली पाहिजे. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक पदवीधराला समान संधी मिळावी हाच माझ्या कामाचा मुख्य केंद्रबिंदू असेल.”
संकल्पपत्रातील प्रमुख मुद्दे
रोजगार व कौशल्यविकास : जिल्हानिहाय रोजगार आराखडा तयार करणे, AI, Data Science, Cyber Security या आधुनिक तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण, डिजिटल लायब्ररी आणि स्टार्टअप्सना शासकीय योजनांशी जोडणे.
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता : MPSC परीक्षांचे निश्चित वेळापत्रक, डिजिटल प्रणालीद्वारे उत्तरपत्रिका तपासणीत पारदर्शकता आणि पेपरफुटीविरोधात कठोर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी.
शिक्षक आणि शिक्षणाचे प्रश्न : शिक्षक भरती, वेतन, पदोन्नती, बदली आणि अनुदानाचे प्रलंबित प्रश्न सोडवणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि डिजिटल सुविधा पुरवणे.
महिला व क्रीडा क्षेत्राला प्राधान्य : महिला उद्योजकांना प्रोत्साहन, क्रीडा व शिक्षण यांचा समतोल साधण्यासाठी ‘ड्युअल करिअर मॉडेल’ आणि ग्रामीण क्रीडापटूंसाठी विशेष व्यासपीठ.
हे सुद्धा वाचा : रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक अनुभव
हर्षदा देशमुख-जाधव यांनी ‘ड्रीम सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण, ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम, आरोग्य आणि पर्यावरण (वृक्ष माझा सखा) या क्षेत्रांत तळागाळात काम केले आहे. तसेच, ट्रिनिटी शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य म्हणून प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग शिक्षण आणि उद्योगांमधील अंतर कमी करण्यासाठी, तसेच युवकांना बदलत्या बाजारपेठेनुसार रोजगाराभिमुख बनवण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सक्षम प्रतिनिधित्व देण्याचा शब्द त्यांनी यावेळी पुणे विभागातील मतदारांना दिला. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने तापणार असल्याचे दिसून येत आहे.