गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील यांना उमेदवारी
Gokul Chairman Election 2026 : कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गोकुळ चौकाजवळ सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास गोकुळच्या नव्या अध्यक्षाचं नाव समोर येण्याची शक्यता आहे.
राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या राजेश पाटील यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे देखील आमदार होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील चंदगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादीसाठीही मोठा धक्का मानला गेला होता.
राजेश पाटील यांच्या राजकीय प्रवासातील एक विशेष गोष्ट म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. अजितदादांप्रती असलेली त्यांची निष्ठा या विधानातून दिसून आली होती. 2024 मध्ये राजेश पाटील यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनीही कोल्हापूर दौऱ्यात फेटा बांधला नसल्याची चर्चा झाली होती.
गोकुळच्या मागील निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि संजय मंडलिक यांचे चिरंजीव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र, आता मुश्रीफ गटाकडूनच राजेश पाटील यांना गोकुळच्या अध्यक्षपदासाठी संधी मिळाल्याने जुन्या राजकीय मतभेदांवर पडदा पडल्याचं चित्र आहे.
आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील बाजी मारतात की शशिकांत चुयेकर बाजी पलटवतात, याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे.
Ans: महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.
Ans: राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2024 मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
Ans: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांना गोकुळच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.






