
Gokul Kolhapur Protest
कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील पाच शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावरून कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून कसबा बावडा परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. भगवा चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
गोकुळमधील शासननियुक्त संचालकांचा निर्णय हा दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थेच्या सभासदांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.
Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…
या आंदोलनानंतर आता पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली आहे. येत्या सोमवारी कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील तब्बल 25 हजारांहून अधिक नागरिक आणि दूध उत्पादक शेतकरी एकत्र येऊन भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी दिला आहे.
या मोर्चात आजी-माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील दूध उत्पादक सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. ‘गोकुळ तुमची जहागीर नाही. सभासदांचा कौल तुडवून आपली माणसं संस्थेत घुसवण्याचा प्रयत्न करू नका,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा असल्याचाही आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र सरकारने सहकारी संस्था सुधारणा अध्यादेश 2026 जारी केला आहे. त्यानुसार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या पात्र सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीत पाच शासननियुक्त सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये एक सरकारी अधिकारी आणि सहकारी संस्थांचा अनुभव असलेल्या चार तज्ज्ञांचा समावेश असेल.
या निर्णयामुळे गोकुळचा वाद आता केवळ सहकारी संस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर कोल्हापूरच्या राजकारणातही मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
Ans: गोकुळ दूध संघात पाच शासननियुक्त संचालकांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ans: कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आलं.
Ans: कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील 25 हजारांहून अधिक नागरिक आणि दूध उत्पादक शेतकरी भव्य मोर्चात सहभागी होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.